
सफर-ए-शहादत’ दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री गुरु तेग बहादूर यांना आदरांजली
पुणे, ता. (२६) कॅम्प परिसरातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार, गुरुनानक यूथ फाउंडेशन आणि पुण्यातील साध संगतच्या सहकार्याने श्री गुरु तेग बहादूर आणि शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सफर-ए-शहादत’ दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुण व ज्येष्ठ पुरुष आणि महिलांनी या रॅलीत सहभाग घेतला होता.
शेकडो भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीत पुणे शहराचे सह-पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी ९:३० वाजता ‘सत्नाम वाहेगुरु,’ ‘बोले सो निहाल, सत् श्री अकाल,’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या घोषणा देऊन रॅलीला कॅम्प येथील गुरुद्वारा येथून सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, दुचाकी रॅली पुण्याच्या रस्त्यांवरून जात असताना विविध मंडळे, मंदिरे आणि संस्थांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करून आदराने स्वागत केले. यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, इस्कॉनचे भक्त, साधू वासवानी मिशन व गुरुद्वारा सिंग सभा यांचा सहभाग होता. याशिवाय इतर अनेक संस्थांनी अल्पोहार देऊन रॅलीचे स्वागत केले. साधारण सकाळी ११:३० वाजता कॅम्प येथील गुरुद्वारा येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
फोटो ओळी :-
गुरुद्वारा, पुणे कॅम्प :- ‘सफर-ए-शहादत’ दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झालेले नागरिक व भाविक.